Kailas Patil : सध्या महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे. त्यामुळे उष्माघाताच त्रास जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. पण बहुतेक लोकांना भर उन्हात काम करावं लागत आहे. त्यात आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी जोरात तयारी केली असून भर उन्हात प्रचारसभा घेतल्या जात आहेत. मात्र, या कडक उन्हाचा तडाखा लोकप्रतिनिधींना देखील बसू लागला आहे. यामध्ये आता ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांना प्रचारसभेत भोवळ आली आणि ते स्टेजवरच कोसळले.
आज धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रचारसभा भरउन्हात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली आणि ते स्टेजवरच कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या कैलास पाटील यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कैलास पाटील यांना उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे त्यांना चक्कर आली. तसंच त्यांना चक्कर आल्यानंतर काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना तातडीनं गाडीतून रूग्णालयात नेलं. तसंच त्यांना रूग्णालयात नेत असतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.