यावर्षी अयोध्येतला धुमधडाक्यात राम नवमी साजरी होणार आहे.अयोध्येत 500 वर्षानंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीराम भव्य राममंदिरात विराजमान झाले आहेत. लाखो भाविकांना 19 तास रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. अयोध्येत रामनवमीनिमित्त छप्पन भोगाची तयारीही केली जात आहे. यावेळी रामनवमीच्या दिवशी अयोध्येत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने भाविकांनी जन्मोत्सव कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपण कुठेही असले तरी पहावे, असे आवाहन केले आहे.तरीही लाखो भक्त अयोध्येत प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी पोचत आहेत .यावेळी प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना ‘ कोथिंबीर पंजिरीचा प्रसाद मिळणार आहे. हा रामल्लाप्रमाणेच भगवान श्रीकृष्णालाही खूप प्रिय असणारा पदार्थ आहे. लोण्याशिवाय कोथिंबीर पंजिरीचा प्रसादही भगवान श्रीकृष्णाला अर्पण केला जातो.
कोथिंबीर पंजिरी हा एक गोड आणि तितकाच पौष्टिक पदार्थ आहे. कोथिंबीर पंजिरी हा पदार्थ अनेकदा धार्मिक विधींमध्ये देवदेवतांना प्रसाद म्हणून बनवला जातो. हा प्रसाद म्हणून बनवला जाणारा पदार्थ अत्यंत पौष्टीक आहे. भारतात खास करून उत्तर भारतात हा पदार्थ मोठ्या प्रमाणात बनवला जातो. कोथिंबीर पेस्ट ,कमळाच्या बिया , वेलची ,पिठी साखर ,काजू,नारळ पावडर,तूप इत्यादी साहित्य वापरून हा पदार्थ बनवला जातो.
रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले की, दर्शन मार्गावर सावली देण्यासाठी जर्मन हँगर्स बसवण्यात आले आहेत. उन्हाने भक्तांचे पाय भाजू नयेत नयेत म्हणून चटाया टाकल्या जात आहेत. सात रांगेत दर्शनार्थी मंदिरात पोहोचतील. दर्शन मार्गावर पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.