आपचे नेते आणि खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी तुरूंगात पाठवल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे (PM Narendra Modi) आभार मानले आहेत. तसंच यावेळी त्यांनी मोठा दावा देखील केला आहे. तिहार तुरूंगात एक कुख्यात अपराधी आहे. या अपराधीची त्याच्या कुटूंबाशी आणि वकिलांशी भेट घडवून आणली जाते, असा खळबळजनक दावा संजय सिंह यांनी केला आहे. तसंच संजय सिंह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तुरूंगामध्ये छळ होत असल्याचं म्हटलं होतं. आणि मी सहा महिने जेलमध्ये राहून आलो आहे, मला तोंड उघडायला लावू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.
संजय सिंह यांनी सोमवारी एक व्हिडीओ X वर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, “मागील 10 दिवसांपासून मी तुरूंगातून बाहेर आहे. त्यामुळे आता मला शांत झोप लागत आहे. पण 6 महिने मी जेलमध्ये राहिलो तेव्हा मला काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. जर पंतप्रधान मोदींनी मला ही संधी दिली नसती तर मी स्वत:ला कधीच भेटू शकलो नसतो. माझी त्या सर्व महापुरूषांशी कधीच भेट झाली नसती.”
“मी सर्व क्रांतिकारकांशी कधीच बोलू शकलो नसतो, ज्यांच्याबद्दल मी फक्त ऐकलं होतं आणि त्यांच्या गोष्टी वाचल्या होत्या. पण जेव्हा एखादा व्यक्ती एकांतात असतो तेव्हा त्याला खुप काही विचार करण्याची, समजून घेण्याची संधी मिळते”, असे संजय सिंह म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो की त्यांनी मला स्वत:ला भेटण्याची आणि माझी वाटचाल अधिक मजबूत करण्याची संधी दिली. आज खुप सारी माध्यमं विकली गेली आहेत पण इतिहास कधीच विकला जात नाही. कारण जे तुम्हा करता त्याचा इतिहास रचला जातो आणि काय चूक? काय बरोबर? हे लोक ठरवतात”, असेही संजय सिंह म्हणाले.