CM Eknath Shinde Meet Salman Khan : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबाराची घटन घडल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसंच या प्रकरणातील आरोपींना आज मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे. या आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोबतच या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
गोळीबाराच्या या घटनेनंतर अनेकांनी सलमान खानबाबत काळजी व्यक्त केली आहे. तसेच त्याची अनेक दिग्गजांनी घरी जाऊन भेट देखील घेतली आहे. दोन दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी भेट घेतली होती. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सलमान खानची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनालही उपस्थित होते.
या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी सांगितले की, आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेमागे नेमकं कोण आहे? त्याचा शोध घेण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच या कटात जे सहभागी असतील त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले असल्याचे शिंदेंनी सांगितले.
सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, असेही मु्ख्यमंत्री शिंदे म्हणाले.