Ram Navami : आज (17 एप्रिल) चैत्र शुद्ध नवमी, या दिवशी सर्वत्र रामनवमी हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. तर यानिमित्ताने आज आपण रामनवमी या सणाचे खास महत्व जाणून घेणार आहोत.
रामनवमी हा सण सर्व भारतीयांसाठी तसेच जगभरातील रामभक्तांसाठी खूप खास समजला जातो. प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरूषोत्तम म्हटलं जातं. दरवर्षी रामनवमी हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो. तर यावर्षी रामनवमी आज म्हणजेच 17 एप्रिल 2024 रोजी साजरी होत आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. पण, बहुतेक लोकांना रामनवमी साजरी का केली जाते? तिचे महत्त्व काय? हे माहिती नसेल. चला तर मग आता आपण या खास रामनवमी सणाचे महत्त्व जाणून घेऊया.
धार्मिक ग्रंथांनुसार आजच्या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता. अयोध्येचा राजा दशरथ यांच्या घरी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला भगवान रामाचा जन्म झाला होता. तसेच रावणाचा वध करण्यासाठी रामाचा जन्म झाला असे मानले जाते. त्यामुळे राम जन्माचा दिवस हा संपूर्ण देशभारत श्रीराम नवमी म्हणून साजरा केला जातो.
श्रीराम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार आहेत. तसेच भगवान राम हे एक आदर्श पुरूष, राजा, पुत्र आणि पती म्हणून ओळखले जातात. त्यांचे जीवन हे आदर्श आणि नीतिमत्तेचे प्रतीक आहे. त्यामुळे रामनवमी हा दिवस भगवान राम यांच्या सद्गुणांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. तसेच अनेक रामभक्त या दिवशी नवीन संकल्प करत शुभ कार्याची सुरूवात करतात.
तसेच विशेष सांगायचे झाले तर यावर्षी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच या राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर अयोध्येत प्रभू रामाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यात राम मंदिराच्या निर्मितीनंतर यंदाची ही पहिलीच रामनवमी आहे. त्यामुळे अयोध्येत दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. तर रामनवमी उत्सवादरम्यान सूर्यदेव रामलल्लाच्या कपाळावर सुमारे चार मिनिटे टिळक लावतील. रामनवमीवरील सूर्य टिळकाचा हा विधी भाविकांसाठी अत्यंत भावनिक क्षण असणार आहे, जो प्रभू रामाच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. तर रामलल्लाच्या अभिषेकानंतरचा पहिला उत्सव म्हणून यंदा रामनवमीसाठी राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.