भारताच्या निवडणूक आयोगाने बुधवारी भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या “निंदनीय” टिप्पणीबद्दल नोटीस बजावली.
काँग्रेस नेते जी निरंजन यांच्या तक्रारीवर कारवाई करत, निवडणूक आयोगाने नमूद केले की केसीआर यांनी 5 एप्रिल रोजी सिरसिल्ला येथील पत्रकार बैठकीत काँग्रेस पक्षावर टीका करताना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले होते.आयोगाने असेही नमूद केले की केसीआर यांच्या भाषणाबाबत यापूर्वीही अनेकवेळा सूचना जारी करण्यात आल्या होत्या.
आयोगाला 6 एप्रिल रोजी तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सीनियर उपाध्यक्ष जी. निरंजन यांनी तक्रार सादर केली होती. ज्यामध्ये के. चंद्रशेखर राव यांनी सिरिल्ला येथे त्यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसपक्षावर असभ्य, अपमानास्पद आणि आक्षेपार्ह आरोप केल्याचे म्हंटले आहे.
निवडणूक आयोगाने केसीआर यांना 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांच्या वक्तव्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.नियोजित वेळेत त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल, असेही निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.