राम नामाचे महत्त्व रामरायाचे चरित्र शतकोटी श्लोकांइतके उदंड विस्तार पावलेले आहे.त्यातील एकेक अक्षर सुद्धा मनुष्यांच्या महापातकांचा नाश करणारे आहे.रामरक्षेचा हा पहिलाच श्लोक आश्वासन देतो की, तुमचं मन पूर्वी केलेल्या कर्मांच्या संस्काराने वाईट झालेले असले तरी ते रामनामाने शुद्ध व पवित्र होईल. रामाचे गुण,त्यांनी आचरलेला मार्ग,त्यांनी दाखवलेले मर्यादापूर्ण जीवन, त्यांची स्नेहपूर्ण अलिप्तता,स्थिरता,प्रेमस्वरूप व ज्ञानस्वरूप आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते.असे श्रीराम समोर असले की, मनात वाईट विचार येतच नाहीत.
रावणाला रामाचे रूप घेऊन सीतेच हरण करणे सोपे होते पण रावण म्हणतो मी जर रामरूप घेतले तर माझे विचारच बदलतील,मी रामासारखाच होईन.क्षुद्र विचारच येणार नाहीत. शतकोटिश्लोकांचं रामचरित्र आम्हाला सांगा असे म्हणून देव,दानव व मानव श्री शंकरांकडे हट्ट धरून बसले.शंकरांनी तीन समान वाटण्या केल्या.प्रत्येकाला तेहतीस कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस श्लोक आले व एक श्लोक उरला.त्याचीही वाटणी.श्लोक अनुष्टप छंदातील अक्षरे ३२. मग समान दहा दहा दिली. दोन अक्षरे राहिली “राम “. ती शंकरांनी आपल्या कंठात धारण केली. “राम” ही दोनच अक्षरे मानवाचा उद्धार करायला पुरेशी आहेत.रामकथा श्रवण करा,रामनाम घ्या.चित्त सदैव पवित्र राहिल. महापातकनाशनम् असे रामनाम मुखाने म्हणा.
या श्लोकात सीता लक्ष्मणासह रामाचे ध्यान सांगितले आहे.नीलकमळाप्रमाणे श्यामल कांती असणारा राम,राजीवलोचन अर्थात कमळदळाप्रमाणे सुंदर लोचन असणारा राम,सीता व लक्ष्मणासह असणारा राम हवा.राम वाल्मिकी ऋषींना म्हणाले- मी येथे अरण्यात कोठे राहू.राम हा सर्वव्यापी आहे तो प्रत्यक्ष ईश्वर आहे.तो नाही अशी जागाच नाही.मग तू कोठे रहावे हे कसे सांगता येईल?
राम म्हणाले सीता व लक्ष्मणासहित कोठे राहू?रामा,सीता व लक्ष्मणासह तू भक्तांच्या हृदयात रहा. सीता हे भक्तीचं प्रतिक तर लक्ष्मण हे संयमाच व वैराग्याचं प्रतिक.रामाचं ध्यान सीता व लक्ष्मणासह म्हणजे भक्ती,संयम,वैराग्यजटेच्या व मुकुटाने सुशोभित श्रीराम. मुकुट हे राज्यवैभवाचे प्रतिक तर जटा वैराग्याचे प्रतिक.वैभव व वैराग्य दोन्हीही एकत्र असणं महत्वाचं. जो खड्ग,तलवार,भाता,धनुर्बाण यांनी सुसज्ज आहे, असा श्रीराम निशाचरांचा,राक्षसांचा अंत करणारा आहे.रात्र हे अंधाराचे, अज्ञानाचे प्रतिक. वाईट कृत्ये ही रात्रीच घडत असतात,ती करण्यासाठी जे निशाचर,राक्षस फिरत असतात त्यांचा नायनाट प्रभुरामचंद्र करतात. रामाच्या प्रकाशाने रात्रीचा म्हणजेच अंधाराचा नाश होऊन प्रकाशीत होतात.मन,बुद्धी,अंतःकरण प्रकाशीत होते.
जो जन्मरहित आहे आणि सर्व ठिकाणी व्यापून आहे तो परमात्मा जगताचे रक्षण करण्यासाठी स्वतः अवतार घेतो.निर्गुणातून सगुणात येतो. गीतेत सांगितले आहेच – “यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।” रामरक्षेत जगत् त्रातुम् ह्या दोन शब्दात गीतेतील अवतार कार्य सांगितले आहे.दुर्जनांचा परिहार व सज्जनांचे रक्षण करण्यासाठी श्रीरामांचे खड्ग,धनुष्यबाण सज्ज आहेत. दुष्टांचे शस्त्राने,वाईट प्रवृत्तीचे रामनामाने,गुणांच्या श्रवणाने आणि ध्यानाने नाश होतो. ह्या श्लोका पासून म्हणजे श्लोक क्रमांक ५ पासून ते ६,७,८,९ आणि १० पर्यंत मुख्य रामरक्षा आहे.शरीराच्या डोक्या पासून पाया पर्यंतच्या विविध भागांचे रक्षण रामाने करावे अशी प्रार्थना केली आहे.याला रामनाम कवच म्हणतात.
आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करायचे. शिर-मस्तकाचे रक्षण-टाळूचे रक्षण-अध्यात्मात याला सहस्त्रदलकमल म्हणतात.हे परमात्म्याचे स्थान त्याच्या प्राप्तीचे स्थान आहे.परमार्थिक व ऐहिक दृष्ट्या डोकं चांगलं असेल तरच सर्व चांगलं होईल.त्याचं रक्षण रामाने करावे.इक्ष्वाकू कुळातील राजे धर्मनिष्ठ व अत्यंत सामर्थ्यशाली,देवांना सहाय्य करणारे होते.अशा कुळात ईश्वराने राम अवतार घेतला.राघवाने शरीराच्या सर्वश्रेष्ठ भागाचे रक्षण करावे. माझ्या कपाळाचे रक्षण दशरथात्मज अर्थात दशरथाचा मुलगा श्रीरामाने करावे. माझे भाग्य चांगले असावे.
तत्त्वनिष्ठ व सत्यनिष्ठ जीवन जगण्याचा आदर्श रामाने निर्माण केला त्याप्रमाणे आम्हांलाही कर्तृत्वाची संधी,आलेला प्रसंग आहे अशी पाहण्याची बुद्धी रामरायाने द्यावी.अध्यात्मिक दृष्ट्या ध्यानयोग प्रक्रियेत कपाळावर लक्ष ठेऊन ईश्वरतत्त्वात नाममंत्राने स्मरण करणे व क्रमाक्रमाने चित्त एकाग्र करावे. दशरथ म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये असे मिळून दहा इंद्रियांच्या रथावर आरूढ झालेला जीव-आत्मा म्हणजे अंत:करणात जन्म घेणारा .मनुष्य स्वस्वरूपिला जेव्हा जाणतो तेव्हा आत्मसाक्षात्काराचा अनुभव येतो.ह्या मार्गावरून चालण्यासाठी साधना हवी.माझ्या शिराचे व भालाचे रक्षण रामाने करावे. कौसल्येचा पुत्र राम माझ्या डोळ्यांचे रक्षण करो.चांगलंच पाहण्याची दृष्टी दे.आत्मस्वरूप पाहण्याची देखणी दृष्टी कौसल्यामातेसारखी दे.राम वनवासात जातांना होती तशी दृष्टी वात्सल्य,वियोग,दुःख,कर्तव्य भावना.दृष्टीत आसक्ति अभिलाषा नको.
विश्वामित्रांना प्रिय असणारया रामाने कानांचे ऐकू चांगले यावे.जे कानावर पडेल ते चांगलेच असावे,जे जे सुखकारक व हितकारक आहे ते ते कानांना ऐकू यावे.सद्गुरूंकडून पारमार्थिक आध्यात्मिक ऐकून सस्वरूपाचा ध्यास लागू दे.गुरूंकडून प्रथम ज्ञान आणि शेवटी धन्योद्गार ऐकण्याचे भाग्य आम्हांला श्रीरामाच्या कृपेने प्राप्त होवो.
श्री राम जय राम जय जय राम
सरिता ( पृथ्विजा ) कुलकर्णी डहाणूकर कॉलनी, कोथरूड. पुणे 38 मोबाईल नंबर – 8805322148