Ram Mandir : आज (17 एप्रिल) संपूर्ण देशभरात रामनवमी (Ram Navami) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. विशेष सांगायचे झाले तर यावर्षी अयोध्येत भव्य राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) बांधण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच या राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तर रामलल्लाच्या अभिषेकानंतरचा पहिला उत्सव म्हणून यंदा रामनवमीसाठी राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.
500 वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिरात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जात आहे. तर राम मंदिरात आज दुपारी 12.16 वाजता अभिजीत मुहूर्तीवार रामलल्लाच्या मूर्तीचा सूर्याभिषेक होणार आहे. त्यामुळे भाविक मोठ्या संख्येने मंदिरात पोहोचले आहेत.
या खास दिवशी अयोध्येत पहाटे साडेतीन वाजल्यापासून रामलल्लाच्या दर्शनाला सुरुवात झाली आहे. तसेच अयोध्येत आज सुमारे 25 लाख भाविक पोहोचतील असा अंदाज आहे. त्यासाठी तयारीही करण्यात आली आहे.
आज राम मंदिरात पहाटे 5 वाजता शृंगार आरती झाली. तर रामलल्लाला भोग अर्पण करताना काही काळ फक्त पडदा ठेवण्यात आला होता. रामनवमीनिमित्त आज राम मंदिर रात्री 11 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. त्यादरम्यान भोग आणि आरतीही होईल. तर दुपारी 12.16 वाजता रामलल्लाच्या कपाळावर सूर्यकिरणांचा अभिषेक होईल. सुमारे 4 मिनिटे रामललाच्या कपाळावर सूर्यकिरणांचा अभिषेक केला जाईल. यावेळी, अयोध्येतील भाविकांना गर्भगृहातील चित्रे प्रसारित करण्यासाठी 100 एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.
दरम्यान, रामनवमीनिमित्त अयोध्या धाममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्येच्या प्रत्येक कोपऱ्यात पोलीस आणि निमलष्करी जवान तैनात आहेत. तसेच प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, याचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.