मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी तिहार तुरूंगातून मोठा संदेश दिला आहे. “मी अरविंद केजरीवाल असून दहशतवादी नाही” असा संदेश मुख्यमंत्री केजरीवालांनी तुरूंगातून दिला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांची तुरूंगात जाऊन भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काच ठेवण्यात आली होती.
या भेटीनंतर मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, एखाद्या दहशतवाद्याला भेटावे त्याप्रमाणे ही भेट झाली होती. भगवंत मान यांच्या या प्रतिक्रियेनंतर मुख्यमंत्री केजरीवालांनी तुरूंगातून जनतेला एक संदेश पाठवला आहे. तर हा संदेश आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितला.
केद्र सरकारची एका मुख्यमंत्र्याला देण्यात येत असलेली वागणूक ही फक्त मुख्यमंत्री केजरीवालांच्या भीतीतून देण्यात येत आहे. पण केजरीवाल हे वेगळ्या मातीचे तयार झाले आहेत. ते या अन्यायाला योग्य उत्तर देतील. त्यांना नाउमेद करण्याचा पंतप्रधान मोदींचा आणि गृहमंत्री अमित शाह यांचा मनसुबा पूर्ण होणार नाही, असे संजय सिंग म्हणाले.