Ayodhya Surya Tilak : आज (17 एप्रिल) संपूर्ण देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. रामनवमीनिमित्त आज सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. तसेच अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनानंतरची ही पहिली रामनवमी आहे. त्यामुळे आज राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
आज रामनवमीनिमित्त राम मंदिरात सूर्य -तिलक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आज दुपारी 12 वाजता सूर्याच्या किरणांनी रामलल्लाला तिलक लावला. यावेळी सुमारे 4 मिनिटे सूर्याची किरणं रामलल्लाच्या मूर्तीच्या डोक्यावर पडत होती. अशा प्रकारे रामलल्ल्यांचा सूर्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक अगदी आतुर झाले होते.
एका खास तंत्राच्या मदतीने रामलल्लाच्या मूर्तीवर सूर्याची किरणे प्रक्षेपित करण्यात आली होती. या मदतीने रामलल्लांच्या कपाळावर सूर्यकिरणांचा तिलक लावण्यात आला. सध्या या खास सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राम मंदिर हे तीन मजली आहे आणि यातील तळमजल्यावर असणाऱ्या गर्भगृहाच रामलल्ला विराजमान आहेत. त्यामुळे त्याठिकाणी सूर्याची किरणे पोहोचवणं चॅलेंज होतं. तर रामलल्लाच्या मूर्तीवर सूर्य किरण पोहोचवण्यासाठी CSIR-CBRI रूडकी आणि बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या मदतीने नवीन तंत्रज्ञान विकसित केलं गेलं होतं. यामध्ये तीन आरसे आणि एका लेन्सच्या मदतीने एक सेटअप तयार करण्यात आला होता. यावेळी आरशांच्या मदतीने मंदिरावर पडणारी सूर्याची किरणं ही आतल्या बाजूला वळवण्यात आली होती.तर गर्भगृहापर्यंत नेलेल्या सूर्यकिरणांना लेन्सच्या मदतीने रामलल्लांच्या कपाळावर फोकस करण्यात आले आणि त्यामुळे रामलल्लाला सूर्य-तिलक लावणे शक्य झाले. अशाप्रकारे हा सूर्याभिषेक सोहळा संपन्न झाला.