Ayodhya Surya Tilak : आज (17 एप्रिल) संपूर्ण देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. रामनवमीनिमित्त आज सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. तसेच अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनानंतरची ही पहिली रामनवमी आहे. त्यामुळे आज राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आज रामनवमीनिमित्त राम मंदिरात सूर्य -तिलक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आज दुपारी 12 वाजता सूर्याच्या किरणांनी रामलल्लाला तिलक लावला. यावेळी सुमारे 4 मिनिटे सूर्याची किरणं रामलल्लाच्या मूर्तीच्या डोक्यावर पडत होती. या उत्सवाबद्दल उत्सवाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विट करत माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एका प्रचार रॅली पूर्वी राम मंदिरातील हा सूर्यतिलक उत्सव पाहतानाच फोटो व त्याबरोबर पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मोदी म्हणाले, ”नलबारी सभेनंतर, अयोध्येतील रामलल्लाच्या सूर्य तिलक उत्सवाच्या अद्भुत आणि अनोख्या क्षणाचे साक्षीदार होण्याचे सौभाग्य मला मिळाले. श्री रामजन्मभूमीचा हा बहुप्रतिक्षित क्षण सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. हे सूर्य टिळक विकसित भारताच्या प्रत्येक संकल्पाला आपल्या दैवी उर्जेने अशा प्रकारे उजळून टाकतील.”
एका खास तंत्राच्या मदतीने रामलल्लाच्या मूर्तीवर सूर्याची किरणे प्रक्षेपित करण्यात आली होती. या मदतीने रामलल्लांच्या कपाळावर सूर्यकिरणांचा तिलक लावण्यात आला. सध्या या खास सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राम मंदिर हे तीन मजली आहे आणि यातील तळमजल्यावर असणाऱ्या गर्भगृहाच रामलल्ला विराजमान आहेत. त्यामुळे त्याठिकाणी सूर्याची किरणे पोहोचवणं एक प्रकारचे आव्हान होते. तर रामलल्लाच्या मूर्तीवर सूर्य किरण पोहोचवण्यासाठी CSIR-CBRI रूडकी आणि बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या मदतीने नवीन तंत्रज्ञान विकसित केलं गेलं होतं. यामध्ये तीन आरसे आणि एका लेन्सच्या मदतीने एक सेटअप तयार करण्यात आला होता.