Priyanka Gandhi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान प्रियांका गांधी यांनी म्हटले की, जर देशात ईव्हीएममध्ये छेडछाड न करता निष्पक्ष निवडणुका घेतल्या तर भारतीय जनता पक्ष 180 पेक्षा जास्त जागा मिळवू शकणार नाही.
एएनआयशी बोलताना प्रियांका गांधी यांनी 400 हून अधिक जागा मिळवण्याच्या भाजपच्या दाव्याच्या आधारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, “कशाच्या आधारे ते 400 जागा मिळतील असे सांगत आहेत, ते ज्योतिषी आहेत का? एकतर त्यांनी आधी काही केले आहे आणि त्यांना माहित आहे की ते 400 पेक्षा जास्त जागा मिळवतील. नाहीतर 400 जागा मिळतील असे ते कसे म्हणू शकतात? आज जर या देशात निवडणुका अशा पद्धतीने घेतल्या जात असतील ज्यात ईव्हीएममध्ये छेडछाड होणार नाही, तर मी पूर्ण विश्वासाने सांगू शकते की, त्यांना 180 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. ते 180 पेक्षा कमी जागा जिंकतील.
पुढे प्रियांका गांधी यांनी आपण निवडणुकीकडे लोकांच्या दृष्टिकोनातून पाहतो आणि जनतेच्या मुद्द्यांवर आधारित निवडणुका घेतल्या पाहिजेत, यावर भर दिला. “मी जनतेला हेच सांगतेय की, ही निवडणूक ही जनतेची निवडणूक असायला हवी. ती जनतेच्या प्रश्नांवरच झाली पाहिजे”, असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांवर हल्लाबोल करत प्रियंका गांधी यांनी आरोप केला की, भाजप बेरोजगारी आणि महागाईवर बोलत नाही. शेतकरी आणि महिलांच्या खऱ्या प्रश्नांवर ते बोलत नाहीत. लोकांचे मन वळवण्यासाठीच सर्व संभाषणे होत आहेत.”
लोकांना बदल हवा आहे, असा दावा करून काँग्रेस नेत्या म्हणाल्या की, गेल्या 10 वर्षांपासून लोकांनी त्यांच्या आयुष्यात कोणताही विकास पाहिलेला नाही आणि पंतप्रधान मोदींचा लोकांशी संपर्क तुटला आहे. “लोकांना बदल हवा आहे. त्यांना हे राजकारण नको आहे. गेल्या 10 वर्षात एकाही सामान्य माणसाच्या, स्त्रीच्या आयुष्यात विकास झालेला नाही. त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, महागाई आहे. आज रामनवमी आहे लोकांकडे पैसे नाहीत, पण भाजप बेरोजगारी आणि महागाईबद्दल बोलत नाही”, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.