काल दिवसभरात दुबई देशात मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसाने आधुनिक अन विकसित दुबईची तुंबई केल्याचे पाहायला मिळाले. याचे काही व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध झाले आहेत. जगातील स्मार्ट देशांपैकी एक असलेल्या दुबईत आज सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. या मुसळधार पावसाने दुबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील बंद करावे लागले आहे. जाणून घेऊयात अशी परिस्थिती ओढवण्याची नक्की कारण काय आहे ते?
दुबईत मंगळवारी तुफान पाऊस कोसळला. यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी जमा झाले होते. अनेक वाहने पाण्यात अडकून पडली होती. रस्ते, मेट्रो स्टेशन्स , विमानतळ सर्वच ठिकाणी पाण्याचे साम्राज्य असल्याचे दिसून आले. दीड वर्षात पडतो तितका पाऊस सोमवारी रात्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दुबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे दैनंदिन कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे समजते आहे. काही विमान कंपन्यांनी १८ एप्रिलपर्यंत दुबईतील विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.