देशातील वातावरण सध्या काही प्रमाणात बदलत आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा, बर्फवृष्टी, अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच अवकाळी पावसाचा इशारा राज्यात कायम आहे. राज्यातील काही जिल्ह्याना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सांगली, सातारा आणि कोल्हापूरला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा, हातकणंगले या भागात अवकाळी पावसाने दुपारी हजेरी लावली. गेले काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील तापमान ४० पेक्षा जास्त होते. त्यामुळे पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार आज अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. काही ठिकाणी गारांचा वर्षाव देखील झाला आहे.
शिरोळ तालुक्यात पावसाने झाडाच्या फांद्या तुटल्या आहेत. रस्त्यावरून काही दुचाकी घसरण्याचे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा तर कोकणात उष्णतेच्या लाटेच्या अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने उत्तर कोकणासाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.