देशभरात लोकसभा निवडणुकीचे बागुल वाजले आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण रामटेक लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
रामटेक हा लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवरामुळे चर्चेत आला आहे. उमेदवारी रश्मी बर्वे यांना जाहीर झाली. उमेदवारी अर्ज दाखल झाला आणि नंतर त्यांचा उमेदवारी अर्जच बाद करण्यात आला आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे रश्मी बर्वे यांची उमेदवारी व झेडपीचे सदस्यपद देखील गमवावे लागले. यानंतर त्यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे. अखेर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यामुळे रामटेकमध्ये श्यामकुमार बर्वे विरुद्ध महायुतीचे, शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे या दोघांमध्ये लढत होणार आहे.
रामटेक आपल्याकडे यावा यासाठी भाजपाने शेवट्पर्यंत प्रयत्न केले. मात्र एकनाथ शिंदे यांनी या जागेवरील आपला दावा सोडला नाही. अखेर काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना पक्षात घेऊन रामटेकच्या लोकसभेच्या मैदानात उतरवले. २०१९ मध्ये काँग्रेसने माजी आयपीएस अधिकारी किशोर गजभिये यांना तिकीट दिले होते. मात्र त्यांनी यंदा बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी जाहीर केली. वंचित देखील गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला आहे. रामटेकमध्ये झालेली बंडखोरी, उमेदवारीसुद्धा इच्छुक असणाऱ्यांना उमेदवारी न दिल्याने पसरलेली नाराजी उमेदवारांना भोवणार का? तेथील पक्षीय ताकद याबद्दल जाऊन घेऊयात. २०१४ पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात असणारा हा गड मोदी लाटेत खासदार कृपाल तुमाने हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. मात्र यंदा त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे. रामटेक लोकसभेत ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. ६ पैकी दोन मविआकडे तर ४ महायुतीकडे आहेत.
रश्मी बर्वे यांना तिकीट मिळाले. त्यांच्या मागे सुनील केदार यांची ताकद होती. मात्र त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांची उमेदवारी रद्द झाली आहे. मात्र काँग्रेसने एकाच एबी फॉर्मवर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव लिहिले होते. त्यामुळे आता श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. श्यामकुमार बर्वे हे मूळचे नागपूरजवळील कन्हान कांद्रीचे आहेत. ते वर्ष कांद्री ग्रामपंचायतीचे सदस्य होते. तसेच ते उपसरपंच आणि कृषी उत्पन्न समितीचे संचालक होते. सुनील केदार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सुनील केदार आणि नितीन राऊत यांच्यात रस्सीखेच सुरु होती. नितीन राऊत त्यांचा मुलगा कुणाल राऊत यांना तिकीट मिळावं यासाठी आग्रही होते. पण, हायकमांडने सुनील केदार यांच्या मर्जीतला उमेदवार दिला. रश्मी बर्वेंना उमेदवारी मिळाली. पण, जातवैधता प्रमाणपत्रामुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली आणि काँग्रेसला पहिला धक्का बसला.
या लोकसभेवर भाजपचा आग्रह होता. विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्या कामाचा आलेख घसरला असल्याचे भाजपचे म्हणणे होते. त्यामुळे अखेर तुमानेंना बदली करून राजू पारवेंना उमेदवारी देण्याचा भाजपनं ठेवलेला प्रस्ताव शिंदेंनी मान्य केला. या मतदारसंघात तुमानेंशिवाय दुसरा तुल्यबळ उमेदवार सापडत नसल्यानं शेवटी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना आयात करून उमेदवारी द्यावी लागली.
मूळचे काँग्रेसचे असणारे आणि आता शिवसेनावासी झालेले राजू पारवे हे आधी युवक काँग्रेसमध्ये सक्रिय होते. २०१४ ला त्यांचे भाऊ भाजपचे लोकसभेचे उमेदवार होते. राजू पारवे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राजेंद्र मुळक यांच्या पाठिंब्याने राजू पारवे विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. राजू पारवे शिवसेनेचे उमेदवार असले तरी भाजपच्या आवडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे रामटेकमध्ये भाजपने त्यांच्या विजयासाठी जोर लावला आहे. महायुतीने तुमाने यांच्या विरोधातील असलेली नाराजी पाहता नवीन उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पारवे की बर्वे जिंकणार? तसेच कोणाच्या नाराजीचा फटका कोणाला बसणार हे ४ जून रोजीच कळणार आहे.