लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील २१ राज्यातील १०२ जागांवर उद्या मतदान होत आहे. त्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे. राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर उद्या १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. प्रशासनाकडून मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. या पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे.
पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या पाचही मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत पाचपैकी चार जागा भाजप-शिवसेना युतीने तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे ताकदीचे उमेदवार रिंगणात आहेत.नागपुरात २६ तर रामटेकमध्ये २८ उमेदवार रिंगणात आहेत.
तर उद्या देशात इतरत्र जागांवर होत असलेल्या निवडणुकीमध्ये ८ केंद्रीय मंत्रीही उमेदवार म्हणून मैदानात आहेत. मोदी सरकारमधील मंत्री किरेन रिजिजू, सर्बानंद सोनोवाल, संजीव बालियान, जितेंद्र सिंह, भूपेन्द्र यादव, अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन यांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. तसेच दोन माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (त्रिपुरा) आणि नबाम तुकी (अरुणाचल प्रदेश) यांच्या जागेवर उद्या मतदान होणार आहे.