Ramnavami : काल (17 एप्रिल) रामनवमीनिमित्त (Ramnavami) देशभरात आनंदाचे वातावरण होते, मात्र पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) गोंधळाचे वातावरण होते. मुर्शिदाबाद येथे शोभा यात्रा काढणाऱ्या राम भक्तांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनेक जण जखमीही झाले आहेत.
शोभा यात्रेदरम्यान अचानक दगडफेक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी रवाना करण्यात आला. या प्रकरणी पोलीस या घटनेत सहभागी असलेल्या लोकांची माहिती गोळा करत आहेत. याआधीही शोभा यात्रा मिरवणुकीत दगडफेकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
रामनवमी उत्सवानिमित्त मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये बुधवारी सायंकाळी हिंदूंकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राम भक्त मिरवणुकीत जात असताना अचानक त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. मिरवणुकीत अनेक मोठे दगडही लोकांवर पडले आणि ते जखमी झाले. दगडफेकीमुळे गोंधळ उडाला. काही लोक छतावरून दगडफेक करताना दिसल्याचेही सांगितले जात आहे. यावेळी रामभक्तांचा रोषही वाढू लागला आणि पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले.
याबाबत भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करत ममता सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रत्येक वेळी लक्ष्य केले जाते पण पश्चिम बंगाल सरकार गप्प बसून अशा घटनांना प्रोत्साहन देते. सरकार कारवाई करत नसल्याने अशा अराजकवाद्यांचे मनोधैर्य वाढते, असे मालवीय म्हणाले.