लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघातील लढत जोरदार रंगणार असल्याची चिन्हे गेले काही दिवस दिसत आहेत. पवार घराण्यातील लढतीमध्ये पवार कुटुंबातील चांगलेच वाकयुद्ध रंगले आहेत. शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडताना दिसत नाहीयेत. काही दिवसांपूवी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि भावी उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उल्लेख घराबाहेरची व्यक्ती असा केला होता. त्यांवरून शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
त्याला प्रत्युत्तर देत अजित पवार यांनी बुधवार चार दिवस सासूचे संपले, आता चार दिवस सुनेचे येऊ द्या, असे वक्तव्य केले होते. बारामतीमध्ये येऊन सुनेत्रा पवार यांना 40 वर्ष झाली तरी बाहेरचे म्हणत आहेत, असाही जोरदार टोला अजित पवार यांनी शरद पवार यांना लगावला होता. आता त्याला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत .पवार यांच्या घरण्यातील कोणत्या सासूने निवडणूक लढवली? असा सवाल उपस्थित केला आहे.सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे पवार घराण्यातला हा वाद पुन्हा एकदा वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.
” माझ्या आईला फोटो काढलेले ही आवडत नाही. माझी कोणती ही काकी अथवा आई (सासू) कधी राजकारणात आलेली नाही. आशा काकी, सुमिती काकी, भारती काकी आणि माझी आई अशी कोणतीही सासू राजकारणात आल्या नाही. या सर्व आपले खासगी जीवन जगल्या आहेत”, असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर दिले आहे. थोडक्यात सांगायचे तर सुप्रिया सुळे यांनी आपली वाहिनी सुनेत्रा पवार यांनी राजकारणात येऊ नये असा सल्ला अप्रत्यक्षपणे दिला आहे.
तसेच निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील नाती पुर्ववत होतील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले होते. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की , माझी कोणासोबतच नाती बिघडत नाहीत. माझी सर्वांशी नाती चांगली आहेत. राजकारणामुळे माझ्या नात्यासंबंधात परिणाम होत नाही.
एकूण लोकसभा निवडणुकीमध्ये नणंद भावजयीमधला हा कलगीतुरा चांगलाच रंगणार आहे यात शंका नाही.