पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) सिलिगुडी सफारी पार्कमधल्या सिंह आणि सिंहिण यांच्या ‘अकबर आणि सीता’ यांच्या नावावरून वाद झाल्यानंतर आता त्यांना नवी ओळख देण्याची तयारी सुरू झाली आहे. नवीन प्रस्तावानुसार सिंहाचे नाव सूरज आणि सिंहीणीचे नाव तनया असू शकते. मात्र, ही नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. हा नावांचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला होता. विश्व हिंदू परिषदेने या नावांवर आक्षेप घेतला होता. ‘अकबर’ आणि ‘सीता’ची जोडी हे हिंदूंच्या भावनांचा अपमान करणारे आहे, असे विहिंपचे म्हणणे होते. 12 फेब्रुवारी रोजी सिलीगुडी येथील बंगाल सफारीमध्ये सिंह सिंहिणीला आणण्यात आले होते. हे एका बदली कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आले.
पश्चिम बंगाल (West Bengal) वन विभागाने सिलीगुडी येथील सफारी पार्कमध्ये एका सिंहाचे नाव ‘अकबर’ आणि सिंहिणीचे नाव ‘सीता’ असे ठेवले आहे. त्यावरुन विश्व हिंदू परिषद (VHP) द्वारा वनविभागाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, कोर्टाने वादग्रस्त नावे टाळावीत असे आदेश दिल्यानंतर हे प्रकरण राज्य सरकारने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवले असून त्यांनी नवीन नावांचा प्रस्ताव पाठवला आहे.
या नावांवरील वादानंतर राज्य सरकारने त्रिपुरामध्ये नावे ठेवण्यात आल्याचे सांगितले होते. यानंतर त्रिपुराचे वन अधिकारी प्रवीण लाल अग्रवाल यांना निलंबित करण्यात आले. विश्व हिंदू परिषेदेने या नावावर आक्षेप घेतल्यानंतरत हे प्रकरण कोलकाता उच्च न्यायालयात जाऊन पोहोचले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सिंह आणि सिंहिणीची नावे बदलण्याचे आदेश दिले होते. सिंहाचे नाव ‘अकबर’ आणि सिंहिणीचे नाव ‘सीता’ ठेवल्यामुळे हा सर्व वाद निर्माण झाला होता. विहिंपने याला भावना दुखावणारे कृत्य म्हटले होते. कोलकाता उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली, तेव्हा न्यायमूर्ती सौगता भट्टाचार्य यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या महाधिवक्त्यांना विचारले की, एखाद्या प्राण्याचे नाव देव, पौराणिक नायक, स्वातंत्र्यसैनिक किंवा नोबेल पारितोषिक विजेत्याच्या नावावर ठेवता येते का ? असा मलाच प्रश्न पडतो. पश्चिम बंगाल हे कल्याणकारी अन् धर्मनिरपेक्ष राज्य आहे. सीता आणि अकबराला सिंहाचे नाव देऊन वाद का निर्माण करताय? हा वाद टाळायला हवा होता, असेही न्यायमूर्ती म्हणाले. तसेच केवळ सीताच नाही तर मी कोणत्याही सिंहाला अकबर असे नाव देण्याचे समर्थन करीत नाही असेही न्यायमूर्तींनी अधोरेखित केले आहे.