Narayan Rane : आज (18 एप्रिल) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातून नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. तर ते महाविकास अघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना लढत देणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून मोठा संभ्रम निर्माण झाला होता. कारण भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी या जागेवर दावा केला होता. शिवसेना शिंदे गटाकडून या जागेसाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावा केला होता. पण अखेर किरण सामंत यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उमेदवारी मिळताच नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात जागा वाटपाबाबत कोणताही तिढा नव्हता. या जागेसाठी मलाच उमेदवारी मिळणार हे आधीच माहिती होते. त्यामुळे मी प्रचाराला सुरूवात केलेली. तर आता विकासाचा आणि मोदींचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आम्हाला 400 पार करायचे आहेत.”
पुढे नारायण राणेंनी उदय सामंत आणि किरण सामंत यांचे आभार मानले. “मी उदय सामंत आणि किरण सामंत यांचा आभारी आहे. तसेच पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे”, असे नारायण राणे म्हणाले.
“या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झालेला नाही. आम्ही यासाठी आधीपासून काम करत होतो. तसेच किरण सामंत हे नाराज नाहीत आणि आम्ही या निवडणूकीत एक साथ काम करू. यावेळी तुम्हाला आमचा फेविकॉल जोड दिसेल. राणे आणि सामंत मिळून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ”, असेही राणे म्हणाले.