Loksabha Election 2024 : आज (18 एप्रिल) पुण्यात (Pune) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा पार पडली. बारामतीच्या (Baramati) उमेदवार खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, आम्ही आता फक्त ट्रेलर दाखवतो, कारण पिक्चर दाखवायला आपल्याकडे खूप वेळ आहे. तसेच मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की, देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं ठरलं आहे की बळकट हाताने स्वाभिमानाची मशाल पेटवायची अन् विजयाची तुतारी फुंकायची आहे.
महायुतीला आता पराभव दिसू लागल्यामुळे ते देशाच्या धोरणांविषयी बोलत नाहीत. फक्त वैयक्तिक टीका करतात. परवा मला कुणीतरी विचारले की नटसम्राट पाहिजे की कार्यसम्राट पाहिजे. मी त्यांना सांगितलं की, नटसम्राट परवडतो, कार्यसम्राट परवडतो पण धोके सम्राट, खोके सम्राट आणि पलटुसम्राट परवडत नाही, अशी टीका अमोल कोल्हेंनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर केली.
अजित पवारांनी इंदापूर येथील सभेत तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा, असं वक्तव्य केलं होतं. यावरून अमोल कोल्हेंनी अजितदादांवर निशाणा साधला. “आता हे म्हणत आहेत कचाकच बटन दाबा, आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो. कर काय ह्यांच्या खिशातला आहे का? अहो तुम्ही जनतेकडून कर घेता आणि त्या कराच्या जोरावर तुम्ही कचाकच बटन दाबायला सांगता का? असा सवाल अमोल कोल्हेंनी उपस्थित केला.