काल (१७ एप्रिल) रामनवमीनिमित्त (Ramnavami) देशभरात आनंदाचे वातावरण होते, मात्र पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) गोंधळाचे वातावरण होते. मुर्शिदाबाद येथे शोभा यात्रा काढणाऱ्या राम भक्तांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनेक जण जखमीही झाले आहेत. शोभा यात्रेदरम्यान अचानक दगडफेक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी रवाना करण्यात आला. या प्रकरणी पोलीस या घटनेत सहभागी असलेल्या लोकांची माहिती गोळा करत आहेत. याआधीही शोभा यात्रा मिरवणुकीत दगडफेकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
मुर्शिदाबाद हिंसाचारावर भाजपने ममता बॅनर्जी सरकारला धारेवर धरले आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालांना पत्र लिहून रामनवमी मिरवणुकीत झालेल्या हिंसाचाराची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे. बंगालमध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी झालेला हिंसाचार हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भडकाऊ वक्तव्याचा परिणाम असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या भाषणानंतर प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, त्यामुळे अशी हिंमत उपद्रवी घटकांना आली. सुभेंदू अधिकारी म्हणाले की, मी राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांना पत्र लिहून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीत तातडीने हस्तक्षेप करण्याची आणि या प्रकरणाची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या भडकाऊ भाषणाबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणीही केली आहे.
रामनवमी उत्सवानिमित्त मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये बुधवारी सायंकाळी हिंदूंकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राम भक्त मिरवणुकीत जात असताना अचानक त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. मिरवणुकीत अनेक मोठे दगडही लोकांवर पडले आणि ते जखमी झाले. दगडफेकीमुळे गोंधळ उडाला. काही लोक छतावरून दगडफेक करताना दिसल्याचेही सांगितले जात आहे. यावेळी रामभक्तांचा रोषही वाढू लागला आणि पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले.