लोकशाहीच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील १०२ जागांवर आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात देखील ५ जागांवर आज मतदान सुरु आहे. पूर्व विदर्भातील मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. त्याचा फैसला ४ जून रोजी होणार आहे. राज्यात गडचिरोली-चिमूर, रामटेक, नागपूर, चंद्रपूर , भंडारा गोंदिया या मतदारसंघात मतदान होत आहे.
देशभरात मतदान होत असल्याने सुरक्षा व्यवस्था देखील तगडी ठेवण्यात आली आहे. नक्षली भागांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. तसेच आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठी देखील मतदान पार पडणार आहे. आज पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांसाठी मतदान होत आहे. ज्यासाठी देशभरात १.८७ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण १,६२५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १,४९१ पुरुष आणि १३४ महिला उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासोबत अरुणाचल प्रदेश (६० जागा) आणि सिक्कीम (३२ जागा) विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मात्र जे ५ वाजेपर्यंत रांगेत असतील त्यांना मतदान करण्याची मुभा असेल.
– देशात पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 15.09 % मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले आहे.
– प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी बजावला मतदाराना अधिकार
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा सण आजपासून सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होणार आहे. या सर्व जागांच्या मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना माझे विशेष आवाहन आहे की त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. लोकशाहीत प्रत्येक मत मौल्यवान असते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
– महाराष्ट्रात सर्वात कमी 6.98 % मतदान झाले आहे.