लोकशाहीच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान नागपूर येथे देखील मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे देखील मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी मतदान आपले कर्तव्य आणि अधिकार असल्याचे सांगितले. प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
देशभरात मतदान होत असल्याने सुरक्षा व्यवस्था देखील तगडी ठेवण्यात आली आहे. नक्षली भागांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. तसेच आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठी देखील मतदान पार पडणार आहे. आज पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांसाठी मतदान होत आहे. ज्यासाठी देशभरात १.८७ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण १,६२५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १,४९१ पुरुष आणि १३४ महिला उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासोबत अरुणाचल प्रदेश (६० जागा) आणि सिक्कीम (३२ जागा) विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मात्र जे ५ वाजेपर्यंत रांगेत असतील त्यांना मतदान करण्याची मुभा असेल.