पश्चिम बंगाल आणि निवडणुकांच्या वेळचा हिंसाचार हे समीकरण याही वेळी लोकसभा निवडणुकीचे मतदान चालू असताना पुन्हा एकदा दिसून आले आहे. आज देशातील लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यांतील जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे.भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये 15.09 टक्के मतदान झाले आहे.दरम्यान पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.यावेळी मतदान केंद्रावर तुफान दगडफेक झाल्याचे वृत्तही समोर आले आहे.
पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान चंदमारी येथील बूथजवळ दगडफेक झाल्याच्या माहिती समोर आल्यानंतर परिसरात हिंसाचार उसळला असून तृणमूल काँग्रेसने याबाबत भाजप खासदार निसिथ प्रामणिक यांच्यावर हिंसाचार घडवल्याचा आरोप केला आहे आणि निवडणूक आयोगावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे.चांदमारी येथे दगडफेक झाली असून ; पश्चिम बंगालमधले भाजपचे बूथ अध्यक्ष जखमी झाले आहेत. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीदरम्यान तृणमूलचे ब्लॉक अध्यक्ष अनंत कुमार बर्मन गंभीर जखमी झाले असल्याचेही तृणमूल पक्षाने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.
पश्चिम बंगालमधील माथाभंगा येथे गुरुवारी रात्री केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) जवान एका मतदान केंद्राच्या शौचालयात मृतावस्थेत आढळून आला. राज्यातील तीन जागांसाठी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्याच्या काही तास आधी ही घटना घडली आहे.जवानाला तातडीने रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले आहे.