Devanand Bagal : आज लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज सर्व राज्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसह सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळी मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. एकिकडे मतदान सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मोठा धक्का बसला आहे. (Devanand Bagal Resigned)
देवानंद बागल यांनी राजीनामा दिला आहे. करमाळा तालुका शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा आज राजीनामा दिला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे समर्थक असलेले माजी आमदार नारायण पाटील यांनीही शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिंदेंना मोठा धक्का बसला आहे.
राजीनामा दिल्यानंतर देवानंद बागल यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना, टेंभुर्णी रस्ता यासह अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. पण अंतर्गत गटबाजीमुळे आम्हाला मुख्यमंत्री शिंदेंपर्यंत पोहचू न देण्याची व्यवस्था केली जात होती. याचाच परिणाम म्हणून करमाळ्यात शिवसेना वाढू शकली नाही. म्हणूनच आपण शिवसेना पक्षाच्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे बागल यांनी स्पष्ट केले.
देवानंद बागल यांनी आपल्या पदाचा राजीनामा शिवसेना सचिवांकडे पाठवला आहे. तसेच लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करणार आहेत.