PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (19 एप्रिल) सांगितले की, काँग्रेस (Congress) आणि इंडिया आघाडी (India Alliance) हिंदू धर्म आणि श्रद्धांचा अपमान करण्यात व्यस्त आहेत आणि हे तेच लोक आहेत ज्यांनी भगवान रामाच्या पूजेला “पाखंड” (ढोंगी) म्हटले होते.
दमोह येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेस आणि इंडिया आघाडी आमच्या श्रद्धेचा अपमान करण्यात मग्न आहे. हे लोक म्हणतात की आमच्या सनातनला डेंग्यू आणि मलेरिया आहे. हे लोक अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या विरोधात आहेत. हे ते लोक आहेत जे केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आले नव्हते.
पुढे ते म्हणाले की, सध्याचे भाजपप्रणीत केंद्र कोणाच्याहीपुढे झुकत नाही कारण त्यांचे तत्त्व ‘राष्ट्र प्रथम’ आहे. “आजचे भाजप सरकार हे कोणाच्याही दबावाला बळी पडत नाही आणि कोणाच्याही पुढे झुकत नाही. आमचे तत्व प्रथम राष्ट्र आहे. भारताला स्वस्त तेल मिळायला हवे, म्हणून आम्ही देशहिताचा निर्णय घेतला. तसेच आज जगातील अनेक देशांची स्थिती अत्यंत वाईट आहे, अनेक देश दिवाळखोरीत निघाले आहेत”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“भारताला जगातील एक मोठी शक्ती बनवण्याची ही निवडणूक आहे. जेव्हा जगात युद्धाचे वातावरण असते, तेव्हा युद्धपातळीवर काम करणारे सरकार भारतात खूप महत्त्वाचे असते. अशा वेळी एक मजबूत सरकार हवे आणि पूर्ण बहुमत असलेले भाजप सरकारच हे करू शकते,” असेही पंतप्रधान म्हणाले.
पाकिस्तानची खिल्ली उडवत पंतप्रधान म्हणाले की, शेजारी देश गव्हाच्या पिठासाठी संघर्ष करत आहे. आमचा शेजारी जो दहशतवादाचा पुरवठा करायचा तो पीठ पुरवण्यासाठी धडपडत आहे”, असं म्हणत पंतप्रधानांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.
पुढे पंतप्रधान मोदींनी फिलिपाइन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्यात केल्याबद्दल देशवासियांचे अभिनंदन केले. “आता आम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यातही करत आहोत. या क्षेपणास्त्राची पहिली तुकडी आज फिलिपाइन्सला जात आहे. याबद्दल मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो,” असे ते म्हणाले.