लोकशाहीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. ४ जून रोजी देशात कोणाची सत्ता येणार आहे ते कळणार आहे. आज ७ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. १०२ जागांवर मतदान सुरू आहे. १ वाजेपर्यंत ३९ टक्के मतदान पूर्ण झाले होते. देशभरात मतदान होत असल्याने सुरक्षा व्यवस्था देखील तगडी ठेवण्यात आली आहे. नक्षली भागांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. तसेच आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठी देखील मतदान पार पडणार आहे. आज पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांसाठी मतदान होत आहे. ज्यासाठी देशभरात १.८७ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. दुपारी ५ पर्यंत किती मतदान झाले आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.
पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी दुपारी ५ वाजेपर्यंत ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे कळते आहे. देशातील २१ राज्यांमध्ये १०२ जागांवर आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात ५ जागांवर मतदान होत आहे. १०२ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत राजस्थानमध्ये २२.५१ टक्के मतदान झाले. तर, सिक्कीमच्या ३२ विधानसभा जागांवर ४.६४ लाख मतदारांपैकी २१.२ टक्क्यांहून अधिक मतदारांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. यापूर्वी पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये मतदानादरम्यान दगडफेकीची घटना समोर आली आहे.
त्रिपुरा राज्यात दुपारी ३ पर्यंत ६८.३५ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये ६६.३४ टक्के मतदान झाले. आसाम राज्यात ६० टक्के मतदान पूर्ण झाले. बिहारमध्ये ४० टक्के मतदान झाले आहे. मणिपूरमध्ये ६३.०४ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात तामिळनाडूतील सर्व ३९ जागांवर, राजस्थानमधील २५ पैकी १२ जागांवर, उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी ८ आणि मध्य प्रदेशातील ६ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ५, आसाममधील ५, उत्तराखंडमधील ५, बिहारमधील ४, पश्चिम बंगालमधील ३, मेघालयातील २, अरुणाचल प्रदेशातील २ आणि मणिपूरमधील २ जागांवर मतदान होत आहे. याशिवाय पुद्दुचेरी, मिझोराम, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड आणि अंदमान निकोबारमध्ये प्रत्येकी एका जागेवर मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 1625 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १४९१ पुरुष आणि १३४ महिला उमेदवार आहेत.