लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. यामध्ये देशातील १०२ तर त्यामध्ये महाराष्ट्रातील ५ जागांवर आज मतदान पार पडले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा लोकसभा मतदार संघ तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार सभा घेतली. वर्ध्यातून महायुतीने व भाजपाने विद्यमान खासदार रामदास तडस व अमरावतीमधून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाला नेहमीप्रमाणे मराठीतून सुरूवात केली आहे.
दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेत बोलताना म्हणाले, ”मी आधीही वर्ध्यात येऊन गेलो आहे. मात्र आता आधीपेक्षा खूप मोठा जनसागर जमलं आहे. आम्ही २५ कोटी गरिबांना गरिबीतून बाहेर काढले आहे. आम्ही देशातील गावागावांत वीज, ११ कोटी लोकांना पाण्याचे कनेक्शन दिले आहे. ४ कोटी गरिबांना पंतप्रधान निवास मिळाले आहे. १० वर्षांत ५० कोटींपेक्षा जास्त लोक बँकेशी जोडले गेले आहेत.देशाच्या कानाकोपऱ्यात वंदे भारत सारख्या आधुनिक रेल्वे धावत आहेत. लवकरच बुलेट ट्रेनचे स्वप्न पूर्ण होणार आहे. विकसित भारत , देशातील माता, मुले आणि अन्य घटकांशिवाय अपूर्ण आहे.