लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. यामध्ये २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह एकूण १०२ जागांवर मतदान झाले. यावेळी पहिल्या टप्प्यात १,६०० हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत होते. आता पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारीही समोर आली आहे. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ६२.१८ टक्के मतदान झाले. दरम्यान काही मतदान केंद्रावर हिंसाचाराच्या घटना देखील घडल्या आहेत. छत्तीसगडमध्ये अशीच एक घटना घडली आहे.
छत्तीसगडमधील बस्तर लोकसभा मतदारसंघातील पहिल्या टप्प्यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू आहे. सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, विजापूर येथील मतदान केंद्रापासून ५०० मीटर अंतरावर झालेल्या ग्रेनेड स्फोट झाला. त्या स्फोटात एक जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, सीआरपीएफचे सैनिक विजापूर जिल्ह्यातील उसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गलकम भागात गस्त घालण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी, UBGL सेलचा अचानक स्फोट झाला. यामध्ये एक जवान जखमी झाला आहे.