लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. महाराष्ट्रात ५ जागांवर एकूण ५५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे ते म्हणजे बारामती मतदार संघावर. या ठिकाणी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. दरम्यान सुनेत्रा पवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. बारामती मधील प्रचारसभेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
आपल्या प्रचारसभेत बोलताना महायुतीच्या बारामतीच्या लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार म्हणाल्या, ”मी बारामतीची सून आहे. आपल्या आवडत्या चिन्हाला मतदान करून बारामतीची सून म्हणून मला विजयी करावे. कान्हेरीच्या मारुती कायम माझ्यासोबत राहिला आहे आणि राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काम केले आहे ते सर्वांसमोर आहे. त्यांनी आणलेल्या सर्व योजना सर्वांपर्यंत पोहोचल्या आहेत. देशासाठी मोदींनी केलेले काम पाहून त्यांच्यामागे उभे राहिले पाहिजे. त्यामुळे महायुतीच्या बारामतीच्या उमेदवाराला म्हणजे मला विजयी करा,” या प्रकारचे आवाहन सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना केले आहे.