गेले काही दिवस हवामानातील उष्म्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच सध्या राज्यात तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन कोंकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे स्नायूंना आकडी येणे अशी लक्षणे दिसू लागताच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा.
उष्माघात होऊ नये म्हणून तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात प्यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. जनतेने काळजी घ्यावी .असे आरोग्यखात्याने सांगितले आहे.
एप्रिल-जून महिन्यामध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण द्वीपकल्प, मध्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर भारताच्या बहुतेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या शक्यता आहे.