अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आपला भारत दौरा काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मस्क २२ एप्रिल रोजी भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. गेल्या आठवड्यातच त्याने त्याच्या X हँडल पोस्टवर याची पुष्टी केली होती. मात्र, एलॉन मस्कचा भारत दौरा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. शनिवारी (20 एप्रिल) त्यांनी आपल्या एक्स हँडलवरून पोस्ट करून ही माहिती दिली.
मागील वर्षी मस्क यांनी पंतप्रधान मोदी यांची दोन वेळा भेट घेतली होती. पण, मस्क भारतातच पंतप्रधान मोदींना भेटण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.मस्क हे लवकरच टेस्ला भारतीय बाजारात लॉन्च करण्याची शक्यता आहे. टेस्ला भारतीय बाजारात आणण्याची तयारी या आधीपासूनच सुरु करण्यात आली आहे. टेस्ला ही जगातील इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. पण, टेस्लाने भारतीय बाजारात अद्याप कोणतेही मॉडेल लाँच केलेले नाही. दरम्यान मस्क हे मोदींची भेट घेणार असल्याने त्यांच्या भेटीत कोणते निर्णय होतात हे आपल्याला लवकरच कळणार आहे.