Rameshwaram Cafe Blast Case : 1 मार्च 2024 रोजी बेंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये (Rameshwaram Cafe) स्फोट झाला होता. या स्फोटानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. तर या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) या हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल मतीन ताहा आणि IED बॉम्ब प्लांटर मुसावीर हुसेन शाजिब यांना अटक केली आहे. एनआयएनं या आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.
या दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर एका कर्नलचा उल्लेख आला होता. तर आता एनआयएने या बॉम्बस्फोटाच्या तपासात एक मोठा पुरावा शोधला आहे, जो या स्फोटामागे पाकिस्तानचे कनेक्शन असल्याचं दाखवत आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली आहे की, अटक केलेले मतीन आणि शाजिब हे दोघं कर्नल आहेत. तसेच हे त्यांचं खरं नाव नसून सांकेतिक नाव आहे.
आत्तापर्यंतच्या तपासात अशी माहिती मिळाली आहे की, कर्नल दक्षिण भारतातील अनेक तरूणांना क्रिप्टो-वॉलेटद्वारे निधी पुरवण्याचं काम करतो. तो तरूणांना हिंदू धर्मगुरू, धार्मिक स्थळे आणि प्रमुख स्थळांवर हल्ले करण्यासाठी प्रेरित करतो. तसेच एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, नोव्हेंबर 2022 मध्ये मंगळुरू ऑटोरिक्षा स्फोटानंतर आम्ही कर्नल नावाच्या हँडलरबद्दल ऐकले होते. तो मध्यपूर्वेत गुप्तपणे काम करत असून कर्नल बहुधा अबुधाबीत आहे.
पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि कर्नल इस्लामिक स्टेट (IS) गटाचे छोटे मॉड्यूल तयार करून दहशतवादी कारवायांना पुनरूज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही म्हटले जात आहे.