Kedarnath : केदारनाथमध्ये (Kedarnath) गुंजत असलेला भजनांचा आवाज आता कायमचा नि:शब्द झाला आहे. श्री केदारनाथ धाममधील वेदपाठीचे काम सांभाळणारे 31 वर्षीय मृत्युंजय हिरेमठ (Mrityunjay Hiremath) यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 31 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
वेदपाठी मृ्त्युंजय हिरेमठ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मृत्युंजय हिरेमठ हे केदारनाथ धाम व ओंकारेश्वर मंदिरात वेदपाठी म्हणून कार्यरत होते. तर उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिराचे वेदपाठी मृत्युंजय हिरेमठ यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उखीमठमध्ये मोठी गर्दी झाली होती, यावेळी लोक भावुक झाले होते.
वेदपाठी मृत्युंजय हिरेमठ हे सेवानिवृत्त पुजारी 108 हे श्रीगुरु लिंग जी महाराज यांच्या चार मुलांपैकी सर्वात धाकटे होते. ते केदारनाथ, ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथे वेदपाठी म्हणून काम करत होते. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते घरी परतले आणि घरीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आज शैव परंपरेनुसार मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी, यात्रेकरू पुजारी आणि स्थानिक लोकांच्या उपस्थितीत उखीमठ येथे अश्रूपूर्ण डोळ्यांनी या महान धर्मपंडितांना समाधी देण्यात आली. मृत्यूंजय हिरेमठ हे अविवाहित होते. त्यांचे कुटुंब आता उखीमठ (रुद्रप्रयाग) येथे कायमचे वास्तव्य करते. त्यांचे मोठे बंधू शिव शंकर लिंग हे मंदिर समिती केदारनाथ प्रतिष्ठानमध्ये पुजारी पदावर कार्यरत आहेत.