Uddhav Thackeray : आज (21 एप्रिल) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर (Election Commission) हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली आहे. नोटीस धुडकावत उद्धव ठाकरे म्हणाले की, जय भवानी हा शब्द गीतामधून काढणार नाही.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना मशाल गीतामधून ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ हे दोन शब्द काढण्यास सांगितलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी जय भवानी हा शब्द गीतामधून काढणार नाही, असं म्हणत निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावून लावली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या मशाल चिन्हाच्या गीतामध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’ असं एक कडवं आहे. तर निवडणूक आयोगाकडून त्यातील जय भवानी हा शब्द काढण्याचा फतवा काढण्यात आला आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही.
आमच्यावर कारवाई करणात असाल तर तुम्ही मोदी-शाह यांच्यावरती कारवाई करणार आहात का? हे आम्हाला सांगा. तसंच महाराष्ट्रातील देवांबाबत मोदी-शहांमध्ये इतका द्वेष आहे हे आता कळत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, आमची निशाणी बदलली आहे. आम्ही मशाल चिन्ह घेऊन एक गीत बनवलं आहे. तसंच हे गीत आम्ही निवडणूक आयोगाकडे घेऊन गेलो होता. तर निवडणूक आयोगाने आम्हाला गीतामधील दोन शब्द काढण्यास सांगितले आहे. ‘हिंदू तुझा धर्म, जाणून घे हे मर्म, जीव त्यास कर तू बहाल’ असं कडवं गीतामध्ये आहे. यातील आम्हाला हिंदू शब्द काढण्यास सांगितलं आहे. तर हिंदू धर्म काढायला लावणे योग्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
महाराष्ट्रात आई तुळजा भवानी कुलदैवत आहे. आम्ही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितलं नाही. आम्ही हिंदूत्व सोडलं म्हणणाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर द्यावं. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजा भवानीने आशीर्वाद दिला आहे. जभ भवानी, जय शिवाजी ही घोषणा लोकांच्या मनात आहे. हे आम्हाला निवडणूक आयोगाला आठवण करून द्यायचं आहे. जर उद्या आम्ही हर हर महादेव आणि जय भवानी, जय शिवाजी असं म्हटलं तर चालेल का? हे आम्ही बोलणारच आहोत यावर कुणाचा आक्षेप असायला नको, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.