Saurabh Bhardwaj : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना मद्य घोट्याळ्याप्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तसेच सध्या ते तिहार तुरूंगात बंद आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांच्या आरोगाच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. केजरीवालांना डायबिटीज आहे आणि तिहार तुरूंगात डायबिटीज स्पेशालिस्ट उपलब्ध नसल्याचा दावा, आपने केला आहे. तसंच केंद्र सरकारकडून केजरीवालांना जीवे मारण्याचं छडयंत्र रचलं जात असल्याचा आरोपही आपकडून करण्यात आला.
अरविंद केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार त्यांना 20 ते 22 वर्षांपासून डायबिटीज आहे. तसेच गेल्या बारा वर्षांपासून ते इन्सुलीन घेत आहेत. तर आता त्यांना इन्सुलीनची गरज आहे. इन्सुलीनची गरज असतानाही आपल्याला इन्सुलीन दिलं जात नाहीये. तसंच जर तुम्ही मला डॉक्टर किंना स्पेशालिस्ट देऊ शकत नाही तर मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे माझ्या डॉक्टरचा सल्ला घेऊ इच्छितो, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे आप नेते सौरभ भारद्वाज यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. तिहार तुरूंगाच्या अधिक्षकांना आम्ही पत्र लिहून एम्समधून डायबेटॉलॉजिस्ट आणण्याची मागणी केली आहे. त्यामधून भाजपच्या दाव्याची पोलखोल होत आहे.
मागील 20 दिवसांपासून साध्या डॉक्टरकडून केजरीवालांच्या प्रकृतीची प्रकृतीची तपासणी केली जात होती. तसंच देशातील अनेक लोकांना मधुमेह आहे. जेव्हा मधुमेहाच्या रूग्णांची तपासणी केली जाते तेव्हा फास्टिंग शुगर आणि जेवल्यानंतरची शुगल लेव्हल चेक केली जात, हे रूग्णांना माहिती असते, असे भारद्वाज म्हणाले.
केजरीवालांची जेवणाच्या दोन तासानंतरची शुगर लेव्हल चेक केली नव्हती. तरी काल त्यांचा खोटा अहवाल दिला गेला. केजरीवालांची शुगर लेव्हल वाढली तरी त्यांना इन्सुलीन देता येऊ नये, यासाठी हे लपवण्यात आलं आहे. मीडियामध्ये वातावरण तयार केलं जावं आणि केजरीवालांचे अवयव निकामी होत राहावे हा यामागचा हेतू आहे. केजरीवालांच्या हत्येचा कट केंद्र सरकार रचत आहे, असा आरोपही सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.