2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे केले उद्घाटन
विशेष टपाल तिकीट आणि नाणे केले जारी
नवी दिल्ली, 21 एप्रिल : भारताची ओळख हीच आपली शक्ती असा नवीन पिढीचा विश्वास आहे. स्वाभिमानाची भावना जागृत झाल्यावर एखाद्या राष्ट्राला प्रगतीपासून रोखणे अशक्य होते याचा पुरावा भारत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे महावीर जयंतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे त्यांनी आज (रविवार) उद्घाटन केले. मोदींनी भगवान महावीरांच्या मूर्तीला अक्षता आणि फुलांच्या पाकळ्या अर्पण करून आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी यावेळी शालेय मुलांनी भगवान महावीर स्वामींच्या जीवनावर आधारित “वर्तमान में वर्धमान” या नृत्यनाट्याचे सादरीकरण पाहिले. यावेळी पंतप्रधानांनी विशेष टपाल तिकीट आणि नाणेही जारी केले.
भव्य भारत मंडपम आज 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचा साक्षीदार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. शाळकरी मुलांनी सादर केलेल्या भगवान महावीर स्वामींच्या जीवनावर आधारित नृत्य नाटिका “वर्तमान में वर्धमान” चा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, भगवान महावीरांनी वर्णित केलेल्या मूल्यांप्रती तरुणांचे समर्पण आणि वचनबद्धता हे राष्ट्र योग्य दिशेने पुढे जात असल्याचे लक्षण आहे. यावेळी पंतप्रधानांनी विशेष टपाल तिकीट आणि नाणेही जारी तिकीट केल्याचा उल्लेख केला तसेच जैन समाजाच्या मार्गदर्शनाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल त्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैन समाजातील संतांपुढे नतमस्तक होऊन महावीर जयंतीच्या पावन प्रसंगी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी आचार्यांबरोबर काहीच दिवसांपूर्वी झालेल्या भेटीचे स्मरण केले आणि त्यांचे आशीर्वाद आजही आपल्याला मार्गदर्शन करत असल्याचे सांगितले.
पंतप्रधानांनी 2550 व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाच्या महत्त्वावर भर दिला आणि हेच वर्ष अमृत काळाचा प्रारंभिक टप्पा असून देश याच काळात स्वातंत्र्याच्या सुवर्ण शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे यासारख्या विविध आनंददायी योगायोगांची नोंद केली. राज्यघटनेचे 75 वे वर्ष आणि देशाची भावी दिशा ठरवणारा लोकशाहीचा उत्सवही याच वर्षात असल्याचे त्यांनी सांगितले.
अमृत काळाची कल्पना केवळ संकल्प नव्हे, तर एक आध्यात्मिक प्रेरणा आहे, जी आपल्याला अमरत्व आणि शाश्वतता यातून जीवन जगायला शिकवते हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “ 2500 वर्षांनंतरही आपण भगवान महावीरांचा निर्वाण दिवस साजरा करत आहोत आणि मला खात्री आहे की देश पुढील हजारो वर्षांपर्यंत भगवान महावीरांच्या मूल्यांचे जतन करत राहील”, असे पंतप्रधान म्हणाले. भारताची शतके आणि सहस्राब्दीमध्ये कल्पना करण्याची ताकद, या दूरदृष्टीच्या दृष्टिकोनामुळे भारत आज पृथ्वीवरील सर्वात प्राचीन संस्कृती आणि मानवतेचे सुरक्षित आश्रयस्थान बनली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “हा भारत एकमेव असा देश आहे जो केवळ स्वत:चा नाही तर सर्वांसाठी विचार करतो आणि प्रत्येकावर विश्वास ठेवतो. हा भारतच आहे जो केवळ परंपरांबाबतच बोलत नाही तर धोरणांबाबतही बोलतो. हा भारतच आहे जो शरीरातील ब्रह्मांड, जगातील ब्रह्मा आणि सजीवामधील शिव याबद्दल चर्चा करतो,” असे पंतप्रधान म्हणाले.
साचेबद्ध विचारांचे रूपांतर मतभेदांमध्ये होऊ शकते, तथापि, चर्चेच्या स्वरूपानुसार चर्चेमुळे नवीन आयाम तयार होऊ शकतात किंवा विनाशही होऊ शकतो, असे पंतप्रधान म्हणाले. या अमृतकाळात गेल्या 75 वर्षांचे मंथन अमृताकडे नेले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. “ज्या काळात जागतिक स्तरावर अनेक देश युद्धात सापडले आहेत त्या काळात आपल्या तीर्थंकरांच्या शिकवणीला एक नवीन महत्त्व प्राप्त झाले आहे”, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींनी अनेकांतवाद आणि स्यात- वाद यांसारख्या तत्त्वज्ञानांचे स्मरण केले जे आपल्याला एखाद्या गोष्टीच्या सर्व पैलूंकडे पाहण्यास तसेच इतरांचे विचार स्वीकारण्यास शिकवते.
संघर्षाच्या या काळात मानवता भारताकडून शांततेची अपेक्षा करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारताची ही वाढती ख्याती देशाची सांस्कृतिक प्रतिमा, वाढती क्षमता आणि परराष्ट्र धोरण यामुळे असल्याचे त्यांनी सांगितले. “आज आपण सत्य आणि अहिंसेची तत्त्वे जागतिक व्यासपीठावर पूर्ण आत्मविश्वासाने मांडत आहोत. जागतिक समस्येवरील उपाय प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरेत सापडतो, असे आपण जगाला सांगत आहोत. त्यामुळेच भारत विभाजित जगात ‘विश्व बंधू’ म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करत आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मिशन लाइफ सारख्या भारतीय उपक्रमांचा आणि एक पृथ्वी – एक कुटुंब आणि एक भविष्य या संकल्पनेसह एक जग – एक सुर्य – एक ग्रिडच्या आराखड्याचा उल्लेख केला. आज भारत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसारख्या भविष्यकालीन जागतिक उपक्रमाचे नेतृत्व करत आहे, असे त्यांनी सांगितले. “या उपक्रमांमुळे जगात केवळ नवी आशा निर्माण झाली नाही तर आपल्या संस्कृती आणि परंपरेबद्दल जागतिक दृष्टीकोन बदलला आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
जैन धर्माच्या अर्थाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, हा जिन म्हणजेच विजयाचा मार्ग आहे. भारताने दुसऱ्या राष्ट्रावर विजय मिळवण्यासाठी कधीही आक्रमण केले नाही आणि त्याऐवजी स्वतःला सुधारण्यासाठी काम केले यावर त्यांनी भर दिला. महान संत आणि ऋषींनी भारताला अंधकारमय काळात मार्गदर्शन केले, त्यामुळे अनेक महान संस्कृतींचा नाश झाला तरीही देशाला मात्र संकटातून मार्ग शोधण्यात यश मिळाले, असेही ते म्हणाले.
गेल्या 10 वर्षात झालेल्या असंख्य उत्सवांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला आणि जैन आचार्यांच्या निमंत्रणावरून या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न राहिला असल्याचे सांगितले. “संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी, मला माझ्या मूल्यांचे स्मरण करून देणाऱ्या ‘मिच्छामी दुक्कडम’ या वचनाची आठवण झाली”,असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा वारसा असलेल्या योग आणि आयुर्वेदाच्या सौंदर्यीकरणाचाही उल्लेख केला.
पंतप्रधान म्हणाले, “भारतासाठी आधुनिकता हे त्याचे शरीर आहे, तर अध्यात्म हा त्याचा आत्मा आहे. आधुनिकतेतून अध्यात्म काढून टाकले तर अराजकता जन्माला येते. म्हणून त्या मूल्यांचे पुनरुज्जीवन ही काळाची गरज असल्याने भगवान महावीरांच्या शिकवणीचे पालन करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.
25 कोटींहून अधिक भारतीय गरिबीतून बाहेर आले असल्याने भारत भ्रष्टाचार आणि निराशेच्या गर्तेतून बाहेर पडत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. नागरिकांना हा क्षण आपल्या स्मृतीत जपून ठेवण्यास सांगून पंतप्रधानांनी सर्वांना ‘अस्तेय आणि अहिंसा’ या मार्गावर वाटचाल करण्याचे आवाहन केले तसेच राष्ट्राच्या भविष्यासाठी कार्य करत राहण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि प्रेरणादायी शब्दांबद्दल संतांचे आभार मानले.
यावेळी कायदा आणि न्याय मंत्री (स्वतंत्र कार्यभार ), संसदीय कार्य आणि संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल तसेच जैन समाजातील इतर मान्यवर आणि संत उपस्थित होते.
पार्श्वभूमी
24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी अहिंसा (हिंसा न करणे), सत्य (खोटे न बोलणे), अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य (पवित्रता) आणि अपरिग्रह (गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह न करणे) या जैन तत्त्वांद्वारे शांततापूर्ण सह-अस्तित्व आणि वैश्विक बंधुत्वाचा मार्ग प्रकाशित केला.
जैन धर्मात भगवान महावीर स्वामींसह प्रत्येक तीर्थंकरांचे पाच कल्याणक (मुख्य कार्यक्रम) साजरे करतात: च्यवन/गर्भ (गर्भ) कल्याणक; जन्म (जन्म) कल्याणक; दीक्षा (त्याग) कल्याणक; केवलज्ञान (सर्वज्ञान) कल्याणक आणि निर्वाण (मुक्ती/अंतिम मोक्ष) कल्याणक. 21 एप्रिल 2024 हा भगवान महावीर स्वामींचा जन्मकल्याणक दिवस आहे आणि सरकार जैन समाज तसेच जैन समाजातील संतांसह भारत मंडपममध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून हा दिवस साजरा करत आहे.