PM Narendra Modi : काल (21 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस (Congress) नेत्या सोनिया गांधींवर (Soniya Gandhi) निशाणा साधला. ते म्हणाले की, “जे निवडणूक जिंकू शकत नाहीत त्यांनी मैदान सोडले आहे आणि ते राजस्थानमधून राज्यसभा सदस्य झाले आहेत.” सोनिया गांधी यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर पंतप्रधानांनी यावरून मोठं वक्तव्य केलं आहे.
भाजपचे उमेदवार लुंबाराम चौधरी यांच्या बाजूने प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी राजस्थानमधील जालोर येथे पोहोचले होते. जालोर जागेवर चौधरी यांची माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते वैभव गेहलोत यांच्याशी स्पर्धा आहे. जालोर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तर गेली दोन दशके ही जागा भाजप सातत्याने जिंकत आला आहे.
काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “राज्यसभेत राजस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेस खासदारांनी राज्याचे प्रश्न मांडले का? काँग्रेसने राजस्थानमधून दक्षिणेतील एका नेत्याला राज्यसभेवर पाठवले. तो कधी राजस्थानबद्दल बोलला होता का? नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही तुम्ही राज्यसभेवर पाठवले होते. ते आजारी होते, पण तुम्ही त्यांना राजस्थानमध्ये पाहिले का? असा सवाल पंतप्रधानांनी विचारला.
पुढे त्यांनी सोनिया गांधी यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला. आता तुम्ही दुसऱ्या नेत्याला वाचवले आहे, ज्यांना निवडणूक लढवता येत नाही, निवडणूक जिंकता येत नाही ते मैदान सोडून राजस्थानमधून राज्यसभेवर आले आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदींनी सोनिया गांधींवर केली.
“राजस्थान देशप्रेमाने पोखरले आहे. काँग्रेस कधीही सशक्त भारत बनवू शकत नाही हे त्यांना माहीत आहे. देशाला असे काँग्रेसचे सरकार नको आहे. देशाला 2014 पूर्वीची परिस्थिती परत नको आहे”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.