Ranveer Singh Deepfake Video : मागील काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी डीपफेक व्हिडिओ ट्रेंडचे बळी ठरले आहेत. यामध्ये रश्मिका मंदाना, आमिर खान, अक्षय कुमार हे सेलिब्रिटी डीपफेकचे बळी ठरले आहेत. यामध्ये आता अभिनेता रणवीर सिंह हा देखील डीपफेकचा बळी ठरला आहे. सध्या रणवीरचा एक बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या डीपफेक व्हिडीओमध्ये रणवीर सिंह एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना पाहायला मिळाला, त्यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडियावर या प्रकरणावर प्रतिक्रियाही दिली. दरम्यान, बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या डीपफेक व्हिडिओबाबत पोलिसात एफआयआर दाखल केला असून सायबर क्राईमकडून पुढील तपासासाठी दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याची विनंती केली आहे. याआधी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्ट आमिर खान यानेही डीपफेक व्हिडिओविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
अलीकडेच क्रिती सेनन आणि रणवीर सिंह एका फॅशन शोसाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत वाराणसीला गेले होते. त्यावेळची त्यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर रणवीरच्या चाहत्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. या सर्व प्रकारानंतर आता रणवीर सिंहने डीपफेक व्हिडिओविरोधात तक्रार दाखल केली आहे. या डीपफेक व्हिडिओमध्ये रणवीर सिंह एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे.
रणवीर सिंह एका राजकीय पक्षाला पाठिंबा देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, AI च्या मदतीने अभिनेत्याचा ऑडिओ बदलण्यात आल्याने हा व्हिडिओ बनावट आहे. इतकेच नाही तर व्हिडिओमध्ये जो आवाज ऐकू येत आहे तो रणवीर सिंहचा नाही. अधिकृत निवेदन जारी करून रणवीरच्या टीमने लिहिले आहे की, ‘होय, आम्ही पोलिस तक्रार दाखल केली आहे आणि रणवीर सिंहचा AI डीपफेक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सोशल मीडिया हँडलविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.’
दरम्यान, रणवीर सिंहच्या आधी आमिर खानचा राजकीय पक्षाचा प्रचार करणारा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आमिर खाननच्या टीमने व्हिडिओ पोस्ट केलेल्या सोशल मीडिया हँडलविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. एवढेच नाही तर व्हिडिओची सखोल तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.