Virat Kohli : रविवारी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चा फलंदाज विराट कोहलीला पंचांशी वाद घालणे महागात पडले आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल विराट कोहलीला (Virat Kohli) त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. रविवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात केकेआरने आरसीबीचा एका धावेने पराभव केला. आयपीएल 2024 च्या मोसमातील आठ सामन्यांमधला हा आरसीबीचा सातवा पराभव होता.
केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहलीला बाद केल्याने वाद निर्माण झाला होता. विराट कोहलीने तिसऱ्या अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. या सामन्यात केकेआरने आरसीबीसमोर विजयासाठी 223 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस क्रीझवर आले आणि दोन्ही फलंदाजांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली, मात्र तिसऱ्याच षटकात हर्षित राणाच्या चेंडूवर कोहलीने आपली विकेट गमावली. कोहलीने रिव्ह्यू घेतला, पण अंपायरने त्याला बाद घोषित केले.
तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या हर्षितने पहिल्याच चेंडूवर ऑफ स्टंपच्या कमरेवर फुल टॉस टाकून कोहलीला चकित केले. कोहलीला चेंडू बाजूला वळवायचा होता, पण त्याने आधी बॅटचा चेहरा वळवला आणि चेंडू आतल्या बाजूला जाऊन थेट हर्षितच्या हातात गेला. कोहलीने लगेच डीआरएस घेतला. कोहलीचा असा विश्वास होता की, चेंडू कमरेच्या वर आला आहे आणि त्याला नो बॉल म्हणायला हवे. टीव्ही अंपायरने हॉक आय सिस्टीमचा वापर केला होता आणि त्यानुसार कोहलीला आऊट देण्यात आले कारण तो क्रीजच्या पलीकडे गेला होता, पण तिसऱ्या पंचाच्या निर्णयाने कोहली निराश झाला होता.
“विराट कोहलीला ईडन गार्डन्सवर KKR विरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे,” असे आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच विराटने आपल्यावरील मॅच रेफरीने ठोठावलेला दंड मान्य केला आहे.