Vishal Patil : गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. महाविकास आघाडीत ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना सांगलीत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसचे नेते विशाल पाटील देखील या जागेवर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यामुळे महाविकास आघाडीत या जागेवरून मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अशातच आता सांगली लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
आज निवडणूकीतून माघार घेण्याचा शेवटचा दिवसा होता. मात्र, काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी माघार घेतलेली नाही. विशाल पाटील आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. तसेच ते आता ‘लिफाफा’ या चिन्हावर लढणार आहेत.
विशाल पाटील यांनी मागच्या आठवड्यात बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदार संघात अपक्ष अर्ज दाखल केला होता. तसंच आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. पण विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पाटलांना लिफाफा हे चिन्ह देण्यात आले आहे. तर दुसरीकडे या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिट्टी हे चिन्ह देण्यात आले आहे.