मणिपूर अंतर्गत लोकसभा मतदारसंघातील 11 मतदान केंद्रांवर आज फेर निवडणूक पार पडली. निवडणूक आयोगाने शनिवारी याबाबत आदेश जारी केला होता. आज दुपारी 3 वाजेपर्यंत 73.05 टक्के मतदान झाले.19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान या बूथवर हिंसाचार आणि तोडफोड झाली होती.
सजेब, खुराई, ठोंगम, लेकाई बामन कंपू (उत्तर-अ), बामन कंपू (उत्तर-ब), बामन कंपू (दक्षिण-पश्चिम), बामन कंपू (दक्षिण-पूर्व) खोंगमन झोन-V(A), इरोइशेम्बा, इरोइशेम्बा मामंग लेइकाई, इरोइशेम्बा मायाई लेइकाई आणि खैदेम मखा या 11 बूथवर पुन्हा मतदान पार पडले.
संघर्षग्रस्त मणिपूरमधील काही मतदान केंद्रांवर हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या , जिथे काही बदमाशांनी गोळीबार केला आणि ईव्हीएमची नासधूसही केली होती. आज कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काही हल्लेखोरांनी या मतदान केंद्रांवर गोळीबार करून ईव्हीएमची नासधूस केली होती.
हिंसाचाराच्या घटनांमुळे आयोगाने 11 बूथवरील मतदान अवैध घोषित केले. तथापि, काँग्रेसने बूथ कॅप्चरिंग आणि निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत राज्यातील 47 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदानाची मागणी केली होती. यामध्ये अंतर्गत मणिपूरचे 36 आणि बाह्य मणिपूरचे 11 बूथ समाविष्ट होते.
मणिपूरमध्ये १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ६९.१८ टक्के मतदान झाले होते.बाह्य मणिपूरच्या उर्वरित 13 विभागांसाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.