सध्या रशिया-युक्रेन, इस्त्राईल इराण यांच्यात संघर्ष सुरु आहे. जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे का? हा प्रश्न सध्या निर्माण होत आहे कारण जागतिक स्तरावर गोंधळ सुरूच आहे. सध्या जगात अनेक आघाड्यांवर युद्ध सुरू आहे. मध्यपूर्वेत दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. दरम्यान, इराकने सीरियावर रॉकेट डागले आहेत. इराकमधील एका दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. उल्लेखनीय आहे की याआधी शनिवारी लष्करी तळावर स्फोट झाला होता ज्यात एका इराकी सैनिकाला आपला जीव गमवावा लागला होता.
इराकचे पीएम मोहम्मद शिया अल-सुदानी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते आणि यादरम्यान त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. मात्र, अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर अवघ्या एका दिवसातच हा मोठा हल्ला झाला. सध्या इस्त्राईल इराण मध्ये युद्धाचे वातावरण आहे. दोन्ही देशानी एकमेकांवर मिसाईल हल्ले केले आहेत. मात्र हे सुरु असतानाच कोणीतरी इराक देशावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराकचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञात विमानाने केलेल्या हल्ल्यात इराकमधील दोन लष्करी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत, तर तीन जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. इराकवरील ड्रोन हवाई हल्ल्यात हशद शाबी सैन्याचे दारुगोळा गोदाम आणि टाकी मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.
हा हल्ला अमेरिका आणि इस्रायलने केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, दोन्ही देशांनी या हल्ल्याचा इन्कार केला आहे. अमेरिका आणि इस्रायल या दोघांनीही या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. मध्यपूर्वेत सातत्याने तणाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलने इराणवर हल्ला केला होता, ज्याचा बदला म्हणून इराणने इस्रायलवर 300 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र, बहुतांश क्षेपणास्त्रे इस्रायलने हवेतच पाडली. यानंतर इस्रायलने पुन्हा कारवाई करत इराणवर हल्ला केला.