World Book Day : ज्ञान, सर्जनशीलता तसंच कल्पनाशक्तीच्या अथांग क्षेत्राकडं जाणारा वाचन हा एक मार्ग आहे. हा प्रत्येकाच्या दैनंदिन कामकाजाचा भाग. सर्वत्र प्रचलित असलेलं वाक्य म्हणजे, वाचनानं माणूस ज्ञानी होतो. त्याला पुस्तकाच्या रूपानं एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कलाच आहे. वाचन माणसाला माणूस बनवितो, जीवनाला एक नवी दिशा देतो, विचार करायला शिकवितो तसेच जीवनात योग्य, अयोग्याची जाणीव करून देतो. वाचनाची गोडी मनात रुजवली तर माणूस वाचतो. आणि मग सुरू होतो वाचनाचा प्रवास.
पहिलं प्रेम, पहिली भेट, पहिला पाऊस हे सर्वांच्याच लक्षात राहतं. पण तुम्ही केलेल्या पहिल्या अवांतर वाचनाच्या पुस्तकाचं नाव तरी तुमच्या लक्षात आहे का? आपल्याला केव्हापासून वाचनाची सवय लागली किंवा आपण वाचलेलं पहिलं पुस्तक, पहिलं आत्मचरित्र, पहिली कादंबरी कोणती? हे बहुधा अनेकांच्या स्मरणात नसावं. मला वाचन करायला खूप आवडते. माझा वाचनाचा प्रवास साधारणतः मी शालेय जीवनात असताना सुरू झाला. इयत्ता आठवीमध्ये असताना मूल्यशिक्षण या विषयाचे तास घेतले जात होते. आमच्या शाळेमध्ये ‘रामकृष्ण मठ’ या मिशनतर्फे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तेव्हा स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित असलेले सहा पुस्तके मला बक्षीस म्हणून मिळाले. तेव्हापासून पुस्तक वाचण्याची गोडी लागली आणि वाढली. ती आजपर्यंत आहे.
भारतकन्या ‘भगिनी निवेदिता’ हे मी वाचलेलं पहिलं वहिलं पुस्तक. खरं म्हणजे परीक्षेचा जास्त ताण एखाद्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतो आणि अभ्यास करणे कठीण होऊन जाते. तसाच प्रकार माझ्याबाबतीत घडला. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेच्या गोंधळात अवांतर वाचन थोडंसं बाजूलाच राहिलं. जगाला दोन वर्ष कोरोनानं ग्रासलं होतं. त्या कोरोनाच्या काळातच पुन्हा वाचनाची सुरुवात झाली. त्या काळात शाळा, महाविद्यालय, विविध दुकाने बंद असल्यानं पुस्तकंही मिळणं अवघड होतं. तेव्हा काय करावं, हा प्रश्न पडला. काही मार्गदर्शक मित्रांनी मला काही पुस्तकं डिजिटल स्वरूपात पाठवली. मग डिजिटल स्वरूपात वाचनाची सुरूवात झाली.
छावा (शिवाजी सावंत), मन मे है विश्वास (आयपीएस विश्वास नांगरे-पाटील ), कोल्हाट्याचं पोर (किशोर शांताबाई काळे) आदी पुस्तके मला डिजिटल स्वरूपात मिळाली. हा डिजिटल वाचनाचा माझा पहिलाच अनुभव होता. ते कोरोनामुळं माणसाला सर्व काही शिकवले. आणि मीही शिकले. छावा ही मी वाचलेली पहिली ऐतिहासिक कादंबरी आणि मन मे है विश्वास हे पहिलं आत्मचरित्र. खरंतर सर्वांनीच एक आपल्या जीवनावर आत्मचरित्र लिहावं. जगताना आपण काय शिकतोय? अनेक लोकांचे आत्मचरित्र आपण वाचतो. पण आपले आत्मचरित्र कोण वाचणार? हाही एक मोठा प्रश्न आहे. खरंतर कोरोनामुळं माणसं वाचू लागली आहेत. डिजिटल स्वरूप तरी मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेच. वाचन हे एक असं व्यसन आहे, ज्यामध्ये माणूस ‘वाचतो’! हे वाक्य मी सध्या अनुभवत आहे. ते तुम्हीही अनुभवा.
वाचनानं माणूस विचारात उन्नत होतो. स्वतःच्या जीवनात सक्रिय होऊ लागतो. हा माझा अनुभव. वाचनाचे अनेक फायदे आहेत. मी अनेक पुस्तकं, ललित लेखन, कविता संग्रह वाचली. धोंडा, पिवळ्या धम्मक छत्रीतील मुलगी, अखेरचे कारस्थान, गाजलेले सेनानी, सेवाभावाचा कळस-आचार्य विनोबा भावे, मौनांची भाषांतरे (कविता संग्रह), सुधा मूर्ती यांचे वाइज अँड अदरवाइज, शिवाजी द मॅनेजमेंट गुरू, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची फकिरा (कादंबरी), मी माणूस शोधतोय, एक मुठी आसमा, स्टील फ्रेम, युपीएससी मी आणि तुम्ही, इकीगाई, करुणाघन महात्मा बसेश्वर, अग्निपंख, तुका म्हणे, इंसेशिअल विवेकानंद इ. आता पुस्तकांशी मानसिक जवळीक खूप वाढली आहे. दिवसेंदिवस वाचनामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. कथा, कविता, कादंबरी यांची फक्त अन् फक्त बेरीजच होते, याचा खूप आनंद आहे. सरतेशेवटी सांगण्याचा मुद्दा हाच की, वाचन ही एक भूक आहे. ती सतत वाढत राहावी. तेव्हा माणूस ‘वाचतो’!
— ज्योत्स्ना बोंडगे, पुणे