Baramati Loksabha : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. तसेच सर्व राज्यांमध्ये निवडणुकीची जय्यत तयारी केली जात आहे. सर्व पक्ष जोमाने प्रचार करताना दिसत आहेत. तर काल (22 एप्रिल) बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आले. यावेळी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आयोगाने ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह दिले. तर दुसऱ्या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह दिले. त्यामुळे तुतारी चिन्ह नेमकं कोणाचं? असा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच यानंतर शरद पवार गटाने नाराजी व्यक्त करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
सुप्रिया सुळेंना ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आले. तर सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यावरून शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या शेख यांनी निवडणूक चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमामध्ये ‘तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याने तुतारी हे चिन्ह शेख यांना मिळाल्याने मतदारांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. तर आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.