Two Malaysian Navy Helicopters Collide : नुकतीच एक मोठी दुर्घटना घडली आहे. मलेशिया (Malaysia) नौदलाच्या हवाई कवायती आज सुरू होत्या. या कवायती सुरू असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेत जोरदार टक्कर झाली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
रॉयल मलेशियन नेव्ही सेलिब्रेशन सोहळ्याच्या तयारीसाठी हवाई कवायती सुरू होत्या, त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. याबाबत मलेशियन नौदलाकडून जाहीर केलेल्या माहितीनुसार, आज सकाळी मलेशियाच्या पश्चिम भागात असणाऱ्या पेराक येथील लुमूट या नौदलाच्या तळावर हवाई कवायती सुरू होत्या. यावेळी हेलिकॉप्टर्स एकमेकांच्या खूप जवळ होती. तर ही हेलिकॉप्टर्स दूर जात असताना अचानक त्यांची टक्कर झाली. ही टक्कर झाल्यानंतर हॅलिकॉप्टर्सच्या पंख्याचा भाग तुटला आणि दोन्ही हॅलिकॉप्टर्स खाली जमिनीवर कोसळले. या घटनेत 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेत मृत पावलेल्यांची ओळख पटवणे अवघड झाले होते. त्यामुळे आता हे सर्व मृतदेह ओळख पटवण्यासाठी लुमुट येथील लष्करी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
सध्या या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या दुर्घटनेची मलेशियन नौदलाकडून चौकशी केली जात आहे. तसेच या भीषण अपघातानंतर मलेशियन नौदलाच्या वर्धापनदिनाचा सोहळा रद्द होण्याची शक्यता आहे.