दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत रुस अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी ७ मेपर्यंत वाढ केली आहे. आज केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी संपत होती, त्यानंतर त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते.
15 एप्रिल रोजी न्यायालयाने केजरीवाल यांना आजपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 28 मार्च रोजी हजेरीवेळी केजरीवाल म्हणाले होते की, हे राजकीय षडयंत्र आहे, जनता त्याला उत्तर देईल. 28 मार्च रोजी स्वत: केजरीवाल यांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडताना ईडीच्या तपासानंतर खरा घोटाळा सुरू झाल्याचे सांगितले होते. आम आदमी पार्टीला नष्ट करणे हे ईडीचे उद्दिष्ट आहे. आम आदमी पार्टी भ्रष्ट आहे अशी हवा पसरवणे हा ईडीचा उद्देश होता. ईडीचा दुसरा उद्देश म्हणजे पैसे उकळणे.असे गंभीर आरोप केजरीवाल यांनी ईडीवर केले आहेत.
अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण न दिल्यानंतर, त्याच दिवशी संध्याकाळी उशिरा चौकशी केल्यानंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली. 27 मार्च रोजी हायकोर्टाने केजरीवाल यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका 28 मार्च रोजी उच्च न्यायालयाने फेटाळली होती.केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि बीआर एस नेत्या के. कविता यांच्याही न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ झाली आहे.
कोर्टाने के कविता यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दिल्ली कथित मद्य घोटाळाप्रकरणी त्या सध्या अटकेत आहे. के.कविता यांना ईडीकडून १५ मार्च रोजी अटक झाली होती. तेव्हापासून त्या तुरुंगात असून न्यायालयाने दोनवेळा त्यांच्या कोठडीत वाढ केली होती. यानंतर ११ एप्रिल रोजी तिहार तुरुंगातून सीबीआयने के कविता यांना ताब्यात घेतले होते.