दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्या के.कविता (K Kavitha) यांना कोर्टाकडून अद्यापही दिलासा मिळालेला नाहीये. अबकारी धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल आणि के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
आता अरविंद केजरीवाल आणि के कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 1 एप्रिलपासून ते 7 मे पर्यंत वाढ केली आहे. यासोबतच बीआरएस नेत्या के. कविता आणि चनप्रीत सिंग यांच्या न्यायालयीन कोठडीतही 7 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
तिहार जेलमधून या नेत्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अबकारी प्रकरणाशी संबंधित ईडी प्रकरणात तिघांच्याही कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
केजरीवाल यांना ED ने 21 मार्च रोजी अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्या घरातून अटक केली होती, त्यानंतर ते 1 एप्रिलपासून न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात आहेत.
तत्पूर्वी अबकारी धोरण प्रकरणात 15 मार्च रोजी ईडीने के. कविता यांना हैदराबाद येथून अटक केली होती. तर के. कविता यांना 15 एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या कोठडीत 7 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.