Arvind Kejriwal : तिहार तुरुंगात (Tihar Jail) बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना पहिल्यांदा इन्सुलिन देण्यात आले आहे. केजरीवाल यांची साखरेची पातळी वाढल्याने त्यांना इन्सुलिन देण्यात आले आहे.
अरविंद केजरीवाल यांना अटकेनंतर प्रथमच इन्सुलिन देण्यात आले आहे. याबाबत तिहारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केजरीवाल यांना सोमवारी संध्याकाळी कमी-डोस इंसुलिनचे दोन युनिट देण्यात आले. संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी 217 असल्याचे आढळून आले, त्यानंतर तिहारमध्ये त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याला इन्सुलिन देण्याचा निर्णय घेतला.
एम्सच्या तज्ञांनी 20 एप्रिल रोजी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान तिहारच्या डॉक्टरांना सल्ला दिला होता की, केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त असल्यास त्यांना इन्सुलिन दिले जाऊ शकते.
यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनीही खासगी डॉक्टरांकडून इन्सुलिन आणि दैनंदिन सल्ल्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने खासगी डॉक्टरांशी सल्लामसलत करण्याची मागणी फेटाळताना एम्सला वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले होते. केजरीवाल यांना इन्सुलिनची मागणी करत आम आदमी पक्षही सातत्याने आक्रमक होता. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत षडयंत्र रचले जात असून साखरेची पातळी जास्त असूनही इन्सुलिन दिले जात नसल्याचा आरोप आप पक्षाने केला होता.
आज अरविंद केजरीवालांना इन्सुलिन दिल्यानंतर आम आदमी पक्षाने केजरीवालांना दिलेल्या इन्सुलिनला हनुमानाचे वरदान असे वर्णन केले आहे. आप पक्षाच्या एक्स हँडलवर लिहिले आहे की, “बजरंग बली की जय. अखेर भाजप आणि तुरुंग प्रशासन शुद्धीवर आले आणि त्यांनी तुरुंगात सीएम केजरीवाल यांना इन्सुलिन दिले. सीएम केजरीवाल यांची साखरेची पातळी 320 वर पोहोचली होती. हे हनुमानाच्या आशीर्वादाने आणि दिल्लीकरांच्या संघर्षामुळेच शक्य झाले आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत इन्सुलिन पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.”
दरम्यान, सोमवारी केजरीवालांनी तिहार तुरुंगाच्या अधीक्षकांना पत्र लिहून ते रोज इन्सुलिनची मागणी करत असल्याचे म्हटले होते. केजरीवाल यांच्या पत्राच्या एक दिवस आधी, तिहार प्रशासनाने एक निवेदन जारी केले होते की, त्यांनी 20 एप्रिल रोजी एम्सच्या वरिष्ठ तज्ञांसोबत केजरीवाल यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सची व्यवस्था केली होती, या दरम्यान केजरीवाल यांनी इन्सुलिनचा मुद्दा उपस्थित केला नाही किंवा डॉक्टरांनी असा कोणताही सल्ला दिला नव्हता.